Home राजकीय महापालिका निवडणुकीआधी शिंदे गटाला मोठा धक्का ; दादा पवार शेकडो समर्थकांसह ठाकरे...

महापालिका निवडणुकीआधी शिंदे गटाला मोठा धक्का ; दादा पवार शेकडो समर्थकांसह ठाकरे गटात दाखल


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून, पक्षांतरांचे सत्र पुन्हा एकदा जोरात सुरू झाले आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्या निवडणुकांच्या काळात अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्ष बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले. काहींनी तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही पक्ष सोडल्याने अनेक राजकीय पक्षांची ऐनवेळी उमेदवार शोधताना चांगलीच दमछाक झाली. या इनकमिंग-आऊटगोइंग राजकारणाचा सर्वाधिक फटका काही पक्षांना बसला.

नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाले होते. याचा परिणाम इतर सर्व पक्षांवर झाला असला तरी शिवसेना शिंदे गटाला त्याचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. याबाबत शिंदे गटाने उघडपणे नाराजीही व्यक्त केली होती. मात्र महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाल्याने हे चित्र काहीसे बदलल्याचे मानले जात होते.

असे असतानाच आता ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख दादा पवार यांनी आपल्या शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पक्षात प्रवेश करताना दादा पवार यांना अश्रू अनावर झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आज मला पुन्हा घरी आल्यासारखे वाटत आहे. शिंदे गटात जाताना आम्हाला जी आश्वासने देण्यात आली होती, त्यापैकी एकही पूर्ण झाले नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा स्वगृही परत आलो आहोत. आता मरेपर्यंत शिवसेना ठाकरे गट सोडणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

या पक्षप्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाला महापालिका निवडणुकीआधी मोठे बळ मिळाले असून, शिंदे गटासाठी हा धक्का मानला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे आगामी निकालांवर याचा नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound