छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या आता वाढली आहे. त्यातच महायुतीमध्ये अंतर्गत राजकारण सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात असलेले कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नितीन पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यामुळे कन्नड विधानसभेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अचानक नितीन पाटील यांनी अजित पवार यांचा पक्षात प्रवेश केल्यामुळे आता हा मतदार संघ अजित पवार यांना सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कन्नड विधानसभा मतदारसंघांमध्ये उदयसिंह राजपूत हे विद्यमान आमदार आहेत. ते शिवसेनेकडून निवडून आले आहेत. राज्यातील सत्ता संघर्षांमध्ये देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाकडून संधी दिली जाईल, अशी दाट शक्यता आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने माजी आमदार नितीन पाटील हे मैदानात असतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता नितीन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटण्याची शक्यता वाढली आहे. तसेच या मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे सध्या कोणत्याच राजकीय पक्षात नसले तरी ते पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यांचे देखील या मतदारसंघात मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.