शिंदे गटाचा कॉन्ट्रॅक्ट किलर प्रमाणे वापर : रोखठोक मधून टीका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय जनता पक्ष शिंदे गटाचा कॉन्ट्रॅक्ट किलर प्रमाणे वापर करत असल्याची टीका दैनिक सामनातून आज करण्यात आली आहे.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामातल्या रोखठोक या सदरातून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाला टार्गेट करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, शिंदे नावाचे गृहस्थ आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आहेत व ते सत्तेच्या बळावर राज्यात प्रतिशिवसेना स्थापन करू पाहत आहेत. हे म्हणजे मोगलांत सामील झालेल्या एखाद्या गद्दाराने ‘‘शिवराय कोण? हिंदवी स्वराज्याचे खरे मालक आम्हीच!’’ असा दावा करण्यासारखे आहे. या घडीस एकनाथ शिंदे यांचे वर्तन महाराष्ट्रात सगळयात तिरस्करणीय ठरत आहे. इतर सर्व निष्पाप, कर्तबगार शिंद्यांची क्षमा मागून हे लिहावे लागते. एका शिंद्याने महाराष्ट्राच्या पाठीत खंजिरावर खंजीर खुपसून शिंद्यांच्या इतिहासाला, परंपरेला काळिमा फासला आहे!

यात पुढे म्हटले आहे की, शिंदे व त्यांच्या टोळीने शिवसेना सोडली इथपर्यंत ठीक. त्यांनी त्यांचा मार्ग निवडला. राजकारणात हे असे घडायचेच, पण या टोळीने शिवसेनेचा ‘रिपब्लिकन पार्टी’ करण्याचा प्रयत्न केला. देवळात घुसून ५६ वर्षे पुजलेल्या मूर्तीवर घाव घालून तुकडे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उद्धव ठाकरे हे मंत्रालयात जात नाहीत, असा शिंदे व फडणवीस यांचा आक्षेप होता, पण मुख्यमंत्री शिंदे हे फक्त आठ दिवसांतून एकदाच कॅबिनेटच्या दिवशी मंत्रालयात जातात हे आता समोर आले. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय त्यांच्या टोळीचे आमदारच चालवितात.

शिंदे यांना शिवसेना फोडल्याचे इनाम म्हणून राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले. नारायण राणे व त्याआधी भुजबळांसारख्या नेत्यांनाही हा ‘लाभ’ झाला नाही, पण शिंदे यांनी राज्याचे नेतृत्व करण्याची व नेता म्हणून प्रतिष्ठा कमावण्याची संधी गमावली. आता असे दिसते की, भाजप त्यांचा वापर ‘कॉण्ट्रक्ट किलर’प्रमाणे शिवसेनेचा काटा काढण्यासाठी करून घेतोय. हे लोकांना पसंत नाही. बीकेसीचा दसरा मेळावा व त्यात दीड तासाचे वाचून दाखवलेले भाषण यामुळे शिंदे हे नेते नसून ‘कॉण्ट्रॅक्ट किलर’च्या भूमिकेत आहेत या भूमिकेवर ठसा उमटला. पुन्हा ‘‘माझीच शिवसेना खरी’’ व त्यासाठी भाजपची यंत्रणा हाताशी धरून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवली हा चीड आणणारा, हळहळ निर्माण करणारा विषय. शिंदे यांच्या अधःपतनाची ही सुरुवात आहे. शिवसेनेपासून दूर होऊन स्वतंत्रपणे काम करायला हरकत नव्हती, पण शिंदे यांना भाजपने कॉण्ट्रॅक्ट किलर म्हणून वापरले. अशा कॉण्ट्रक्ट किलर्सचा राजकीय अंतही वाईट होतो. महाराष्ट्राचा इतिहास व हिंदू धर्मशास्त्र हेच दर्शवते! अशा शेलक्या शब्दांमध्ये या लेखात टीका करण्यात आली आहे.

Protected Content