
चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राजकीय पक्ष विरहित आणि शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवत ‘शेतकरी जन आक्रोश मोर्चा’ १७ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये नियोजन बैठका सुरू असून, चोपडा येथे १२ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीला शेतकरी, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर सध्या गंभीर संकट कोसळले आहे. केंद्र सरकारने अलीकडेच कापूस आयात शुल्कात कपात केल्यामुळे देशांतर्गत बाजारात कापसाचे दर घरात कापूस येण्याआधीच घसरले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी वर्ग प्रचंड संतप्त झाला असून, केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरोधात उघडपणे आवाज उठवण्यासाठी ‘शेतकरी जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात येत आहे.
याशिवाय, यंदाच्या खरिप हंगामात पिक विमा योजनेचे निकष अचानक बदलल्याने विमाधारक शेतकऱ्यांना यंदा विम्यापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की, मागील वर्षीप्रमाणेच जुन्या निकषांवरच यावर्षीही पिक विमा मंजूर करावा. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीतही परिस्थिती तितकीच गंभीर आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, केळीचा बोर्ड दर ठरवून शासनाने केळीची हमी भावाने खरेदी करावी. त्याचप्रमाणे, केळी पिक विम्याच्या अंतर्गत येणारी विमा रक्कम १५ सप्टेंबरपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
या मोर्च्यामध्ये आणखी एक महत्त्वाची मागणी म्हणजे, विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे. हे आश्वासन अद्यापही न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या सर्व मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
१२ सप्टेंबर रोजी चोपडा येथे पार पडलेल्या नियोजन बैठकीत माजी खासदार उन्मेष पाटील, गुलाबराव वाघ, शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील, देवेंद्र सोनवणे, प्रा. प्रदीप पाटील यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी उपस्थित राहून आपले मत मांडले. यावेळी भानुदास पाटील, प्रकाश पाटील, डॉ. चंद्रकांत बारेला, उर्वेश साळुंखे व त्यांच्या तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चा १७ सप्टेंबर २०२५, बुधवार रोजी दुपारी २ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (कोर्ट चौक) येथून जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जाणार आहे. हा मोर्चा पूर्णतः राजकीय पक्ष विरहित असून काळ्या झेंड्याखाली जिल्ह्यातील सर्व समविचारी संघटना एकत्र येत आहेत. शेतकरी जन आक्रोश मोर्चा समितीने जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या मोर्चाद्वारे शेतकऱ्यांच्या कडवट अनुभवांना आणि सरकारच्या उदासीनतेला सामोरे जाण्यासाठी एक सामूहिक आंदोलन उभे राहत आहे. हे केवळ एक मोर्चा नसून शेतकऱ्यांच्या हक्कांची लढाई आहे, जी आता उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.



