शेंदुर्णी नगरपरिषदेचे कर्मचारी संपात सहभागी

शेंदुर्णी, तालुका जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना यांचेमार्फत नगरपरिषद अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता दिनांक २९ पासून बेमुदत संप पुकारला असून यात शेंदुर्णी येथील संवर्ग अधिकारी सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनामार्फत जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यसंवर्ग पदांचा सातव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेमध्ये समावेश करून सेवार्थ नंबर मिळणे, सहाय्यक आयुक्त तथा मुख्याधिकारी गट ब पदासाठी ६०% जागा राज्यसंवर्गातील अधिकाऱ्यामधुन पदोन्नतीने भरण्यात याव्या, नगरपरिषदांमधील कार्यरत अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे वेतन लेखा कोषागारमार्फत करण्यात यावे या मुख्य मागण्यांसह विविध मागण्याकरीता आज दिनांक २९/८/२०२४ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपात राज्यातील सर्व नगरपरिषद / नगरपंचायती यामध्ये कार्यरत असणारे सर्व संवर्ग अधिकारी / कर्मचारी सहभागी झाले आहे.

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद/ नगरपंचायतीमधील सन २००५ नंतर नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली असल्याने आहे. सेवानिवृत्तीनंतर कोणती योजना सुरू आहे याबाबत शाश्वती नाही. नवीन नगरपरिषद/ नगरपंचायतमधील समावेशनाने सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना व नियतकालानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारे पेन्शन लागू झालेले नाही. त्यामुळे नगरपरिषद/ नगरपंचायतीतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांमधून कमालीचा रोष व्यक्त होत आहे. या समस्येबाबत महाराष्ट्र राज्य संवर्ग अधिकारी संघटनेमार्फत शासनास नगर विकास विभागास व नगरपरिषद प्रशासन संचालन वेळोवेळी निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्येबाबत व मागण्यांबाबत शासन उदासीन असून त्याकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करत आहे अशी कर्मचाऱ्यांची धारणा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे.

संपात राज्यातील नगरपरिषद/ नगरपंचातीचे प्रशासकिय अधिकारी, कर निरिक्षक, लेखापाल, स्थापत्य अभियंता, पाणीपुरवठा अभियंता, स्वच्छता निरीक्षक इत्यादी सुमारे २००० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे अधिकारी कर्मचारी बेमुदत संपावर जात असल्यामुळे त्यांच्या विभागाचे कामकाज ठप्प होणार असुन एकंदर या संपाचा फटका सर्वसामान्य जनतेला मोठया प्रमाणात बसणार आहे.

सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री व वयोश्री योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना तसेच आयुष्मान भारत योजना या विवीध योजनेअंतर्गत नगरपरिषद/नगरपंचायतमध्ये लाभार्थ्यांचे फॉर्म भरणे/मंजुर करणे याबाबत कामकाजावर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना यांचेमार्फत नगरपरिषद अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन, पदोन्नती, सेवार्थ नंबर मिळणे, कोषागरतून वेतन मिळावे यासह विविध प्रलंबित मागण्यांकरिता दिनांक २९ पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात आज सर्व महाराष्ट्रातील संवर्ग अधिकारी कर्मचारी यांचेसह शेंदुर्णी नगरंचायतीचे संवर्ग अधिकारी सहभागी झाले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते संजय गरुड यांनी संपकरी कर्मचारी यांची भेट घेऊन चर्चा केली, तसेच आपल्या मागण्या शासन दरबारी मांडू असा विश्वास दिला.

Protected Content