नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपाचे विद्यमान खासदार आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज (शनिवार) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या पाच वर्षात मोदी सरकारच्या कारभारावर त्यांनी वारंवार टीका केली होती. तसेच अनेकदा त्यांनी थेटपणे पंतप्रधान मोदींविरोधातही भाष्य केले होते. त्यामुळे ते भाजपापासून दुरावले होते. त्यातच भाजपाने त्यांचे लोकसभेचे तिकीटही कापल्याने अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांना बिहारमधील पाटणा साहिब लोकस मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
तब्बल तीन दशकांहून अधिक काळ भाजपसोबत राहिलेले शत्रुघ्न हे सध्या पाटना साहिब मतदारसंघाचे खासदार आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रात त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. मात्र, भाजपमध्ये मोदीयुग सुरू झाल्यापासून ते राजकीयदृष्ट्या अडगळीत पडले होते. त्यांना मंत्रिपदाची संधीही देण्यात आली नाही. त्यामुळे नाराज असलेले सिन्हा गेली पाच वर्षे सातत्याने पक्षनेतृत्वार टीका करत होते. दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांची पक्षाला सोडचिठ्ठी देतांना जड अंतःकरणाने हा निर्णय घेतल्याची भावना सिन्हा यांनी व्यक्त केली.