शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या आतड्याच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयमध्ये मोठ्या आतड्याच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली.

शस्त्रक्रिया झालेल्या या रुग्णाला बुधवार दि. २ मार्च रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

भरत देवराम तायडे (वय ४०, रा. बामणोद ता. यावल) यांना पोटात दुखणे, पोट फुगणे, सारखा अपचनाचा त्रास, उलट्या होत राहणे, वजन कमी होणे अशा प्रकारचे विविध त्रास होते. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे शल्यचिकित्सा विभागामध्ये तपासणी केली. तपासणीमधून त्यांना मोठ्या आतड्याचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यांना तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार शल्यचिकित्सा विभागातर्फे त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर “हेमीकोलेक्टमी” शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

ही शस्त्रक्रिया शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. मारोती पोटे, डॉ. संगीता गावित यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.रोहन पाटील, डॉ. पद्मनाभ देशपांडे, डॉ. उमेश जाधव, डॉ. स्नेहा वाडे यांनी केली. त्यांना शस्त्रक्रिया गृहातील इन्चार्ज परिचारिका नीला जोशी यांच्यासह कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संबंधित शल्यचिकित्सा विभागाच्या डॉक्टरांचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी कौतुक केले. रुग्णाची प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर त्याला वार्ड क्रमांक ७ मधून बुधवारी २ मार्च रोजी रुग्णालयातून निरोप देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. लक्षणे जाणवल्यास ओपीडी काळामध्ये रुग्णांनी शल्यचिकित्सा विभागात दाखवावेअसे यावेळी अधिष्ठाता डॉ.रामानंद यांनी सांगितले.

Protected Content