जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शनिपेठ भागात राहणाऱ्या एका तरुणाच्या हॅक केलेल्या फेसबुक अकाऊंटवरून धार्मिक भावना दुखावतील असे, मिम (चित्र) आज शेअर करण्यात आले आहे. या घटनेची नोंद पोलीस प्रशासनाने घेतली असून पुढील कारवाई सुरु आहे.
या संदर्भात अधिक असे की, शनिपेठ भागात राहणारा फाहीम खान या तुरुणाचे फेसबुक अकाऊंट हॅक दोन महिन्यापूर्वी करण्यात आले होते. परंतू आपण पासवर्ड विसरलो असं समजून संबंधित तरुणाने फेसबुक वापरणे बंद केले. त्यानंतर हॅकरने त्यावर वादग्रस्त मजकूर टाकायला सुरुवात केली. आज देखील विकृत हॅकरने धार्मिक भावना दुखावतील असे चित्र फाहीम खानच्या फेसबुक वॉलवर शेअर केले. या विकृत हॅकरने करीम शरीफ नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती सायबर सेलला देण्यात आली असून पोलीस प्रशासन हॅकरचा शोध घेत आहे. दरम्यान, रावेर तालुक्यात अशाच पद्धतीने सोशल मीडियात वादग्रस्त मजकूर टाकल्यामुळे तणाव निर्माण झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.