मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी’ अशी एक म्हण आहे. या म्हणीवरुन स्त्री जन्माच महत्व विशद होते. आपल्या कार्यकर्तृत्वाने दोन घरांना प्रकाश देणाऱ्या एकुलत्या एक मुलींचा त्यांचा पालकांसह सत्कार करण्याचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या ३० जुन रोजी असणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी तर्फे राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाबद्दल माहिती देताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सांगितले की, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांनी घराबाहेर पडू नये त्यांनी चुल मुल व्यतिरिक्त दुसरे काम करू नये अशी समाजाची भावना असताना शरद पवार यांनी महिलांनी स्वावलंबी व्हावे स्वतःच्या पायावर उभे राहावे त्यांना समान वागणूक मिळावी यासाठी महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.
महिलांना आरक्षण मिळवून दिले, महिलांना न्याय हक्क व स्वतंत्र योजनांचा लाभ मिळण्यासाठी महिला आयोगाची आणि महिला व बालविकास विभागाची स्थापना केली महिलांना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळवून दिला,महिलांना संरक्षण खात्यात आणि पोलिस दलात नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली अनेक महत्वाचे कायदे आणि योजना राबविल्या यामुळे पुरुषप्रधान संस्कृतीत घराबाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची माता भगिनींना संधी मिळाली. तरी सुद्धा त्या काळात कुटुंबातील मुलाला वंशाचा दिवा मानुन मुलीला कायम दुय्यम वागणुक मिळत असे अशा कठीण काळात “मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून, समान वागणूक देऊन, आत्मविश्वास वाढवून तिच्याकडून उत्तम प्रकारचं काम करुन घेऊ शकतो. व्यक्तिमत्व फुलवो शकतो याची शरद पवार यांना खात्री असल्याने व स्त्रीला संधी मिळाली तर ती उत्तम प्रकारचं कर्तृत्व दाखवू शकते असा विश्वास असल्याने शरद पवार यांनी सुप्रियाताई सुळे यांच्या जन्मानंतर दुसरे अपत्य होऊ दिले नाही.
माझा वारस माझी मुलगीच असेल आणि माझी मुलगीच माझे कार्य पुढे नेईल या विचारातून त्यांनी दुसरे अपत्य होऊ न देता समाजा समोर एक आदर्श उभा केला. सुप्रियाताई सुळे यांनीसुद्धा प्रत्येक प्रसंगात शरद पवार यांच्या सोबत ठामपणे उभे राहून आणि आपल्याला मिळालेली जबाबदारी निष्ठेने आणि यशस्वीपणे पार पाडून बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकासाचा रथ सक्षमपणे पुढे नेला आणि मुलींना संधी मिळाली तर ती उत्तम प्रकारच कर्तृत्व दाखवू शकते हा शरद पवार यांचा विश्वास सार्थ ठरवला.
आपल्या आजूबाजूला परिसरातसुद्धा असे अनेक पालक आईवडील आहेत ज्यांनी एका मुलीच्या जन्मानंतर तिलाच आपल्या वंशाचा दिवा मानून दुसरे अपत्य होऊ दिले नाही व समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. ३० जुनला सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी महिला भगिनीतर्फे आपल्या परिसरातील एकच मुलगी अपत्य असणाऱ्या आईवडिलांचा आणि मुलीचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. यातून समाजातील इतर परिवारांनासुद्धा मुलगा मुलगी एक समान असल्याचा संदेश आणि प्रेरणा मिळेल असे रोहिणी खडसे यांनी सांगितले.