अहमदनगर (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव अकोल्याचे आमदार वैभव पिचड हे दोघं पिता-पुत्र ३० किंवा ३१ जुलैला भाजपात प्रवेश करणार आहेत. पिचड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असल्याची अधिकृत घोषणा केली.
राष्ट्रवादीच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी कालच राजीनामे दिले आहेत. तर आज अकोले येथे पिचड समर्थकांचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री पिचड म्हणाले, आपल्यावर अनेक राजकीय वार झाले. व्यक्तिगत टीकाही झाली. मात्र, आपला कोणावरही राग नाही. आतापर्यंतच्या राजकारणात शरद पवार यांची मोठी साथ मिळाली. मात्र, आता देश बदलला आहे. वातावरण बदलत आहे. विकासाच्या बाजूने जायचे की प्रवाहाच्या विरोधात, हा प्रश्न होता. मात्र, आता आम्ही विकासाच्या बाजूने जायचा निर्णय घेतला आहे.