दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लेडी जेम्स बॉन्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनिया दुहान यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या प्रथम अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील असा दावा केला जात होता. पण त्यांनी अचानक काँग्रेसमध्ये प्रवेश करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
सोनिया दुहान यांनी मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सोनिया या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी काही दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. सुप्रिया सुळे यांना केव्हाच आमच्या नेत्या होता आले नाही. आमच्यासाठी शरद पवार हेच नेहमी लीडर राहिले. माझ्या त्यांच्याप्रतीची निष्ठा यापुढेही कायम राहील, असे त्या म्हणाल्या होत्या.
सोनिया दुहान यांच्या या सोडचिठ्ठीनंतर त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील असा दावा केला जात होता. सोनिया दुहान या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या दिल्लीतील राजकारणाचा चेहरा होत्या. पक्षाच्या येथील कामकाजात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.