Home राजकीय शरद पवारांची प्रकृती बिघडली ; बारामतीहून उपचारासाठी पुण्याला रवाना

शरद पवारांची प्रकृती बिघडली ; बारामतीहून उपचारासाठी पुण्याला रवाना


बारामती-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याने राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या ते बारामतीत असून पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत ठीक नसल्याचे संकेत होते, मात्र आज त्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्यात आला. बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी सकाळीच डॉक्टरांची टीम दाखल झाली होती. प्राथमिक तपासणीनंतर दुपारी पुन्हा एकदा वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली. तपासणीत त्यांना ताप, खोकला आणि कफचा त्रास असल्याचे निदर्शनास आले.

आज बारामती तालुक्यातील काठेवाडी येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या तेराव्याचा विधी पार पडत आहे. या विधीसाठी शरद पवार तसेच कुटुंबीय उपस्थित राहणार होते, मात्र सकाळपासून प्रकृतीत झालेल्या बिघाडामुळे त्यांना कार्यक्रमास उपस्थित राहणे शक्य झाले नाही.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारांसाठी पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. काही वेळापूर्वीच शरद पवार पुण्याच्या दिशेने रवाना झाले असून त्यांच्या ताफ्यात रुग्णवाहिकेचा समावेश आहे. त्यांच्या सोबत कन्या व खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. पुण्यात पोहोचल्यानंतर त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करून आवश्यक तपासण्या व उपचार करण्यात येणार आहेत.

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत पक्षनेते, कार्यकर्ते आणि चाहत्यांकडून सतत चौकशी केली जात असून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. डॉक्टरांकडून पुढील वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound