पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीचा शरद पवार गट हा राज्यातील १४ ते १५ जागा लढवणार असून यात जिल्ह्यातील रावेर या जागेवर पक्षाने दावा दाखल केल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूतोवाच केले आहे.
सर्वच राजकीय पक्ष आता इलेक्शन मोडवर आले आहेत. महायुती आणि महाआघाडीतील पक्षांनी जागा वाटपाच्या वाटाघाटी देखील सुरू केल्या आहेत. कालच अजित पवार यांनी आपला पक्ष बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड या चार जागा लढवणार असून यासोबत अन्य जागांबाबत सहकारी पक्षासोबत बोलू असे त्यांनी काल कर्जत येथील शिबिरात सांगितले.
यानंतर आज जयंत पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. या संदर्भात ते म्हणाले की, आम्ही आधी जिंकलेल्या सर्व जागा तर लढवणारच आहोत, पण अन्य जागांवरही उमेदवार उभे करणार आहोत. यात त्यांनी अमरावती, भंडारा, दिंडोरी, रावेर आदी जागांचा उल्लेख केला.
जळगाव आणि रावेर या दोन्ही जागांवर २०१९ साली राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे उमेदवार मैदानात होते. यातील रावेरचा विचार केला असता २००९ आणि २०१४ या दोन निवडणुकीत राष्ट्रवादीने तर २०१९ मध्ये कॉंग्रेसने येथून निवडणूक लढविली. मात्र या तिन्ही निवडणुकांमध्ये भाजपने विजय संपादन केला होता.
आगामी लोकसभा निवडणुकीत रावेरमधून कॉंग्रेसच जागा लढविणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले आहे. यानंतर मात्र आज जयंत पाटील यांनी या जागेवर दावा केला आहे. यामुळे आता रावेरवरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर, जळगावाची जागा नेमकी कोण लढविणार ? याची उत्सुकता देखील निर्माण झाली आहे.