शरद पवारांनी डाव साधून शिवसेना फोडली : रामदास कदम

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शरद पवार यांनी डाव साधून शिवसेना फोडली आहे. आधी त्यांचे संबंध तोडून टाका, त्यांच्या प्रवक्त्यांची हकालपट्टी करा, आणी मगच आमच्यावर कारवाई करा असा घणाघाती हल्ला माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी आज केला आहे.

टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत शिवसेनेचे नुकतेच हकालपट्टी करण्यात आलेले ज्येष्ठ नेते तथा माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, गेल्या ५२ वर्षांपासून मी अव्याहतपणे पक्षाचे काम करत आहे. या वाटचालीत अनेकदा प्राणघातक हल्ले झाले, अनेक दंगलींमध्ये मी मरता-मरता वाचलो. बाळासाहेब असतांना त्यांना या बाबींची कदर होती. ते आमचे मत विचारात घेत होते. मात्र उध्दव ठाकरे यांनी तर बैठका सुध्दा बंद केल्या. गुहागरमधून मला कुणी पाडले हे आज सांगू शकत नाही असे ते म्हणाले.

आमदास कदम यांना शिवसेनेबद्दल बोलतांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना ही आजची शिवसेना राहिलेली नाही. महाविकास आघाडीत आपण जाऊ नये अशी सर्वांची इच्छा असतांनाही ती डावलण्यात आली. पक्षाच्या नेत्यांना उध्दव ठाकरे भेटेनासे झाले. यातूनच आजची अवस्था ओढवली आहे. मात्र, उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे ते म्हणाले. तर शरद पवार यांनी डाव साधून शिवसेनेला संपविल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.

Protected Content