बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. या हत्येने महाराष्ट्र हादरला. राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनातही हे प्रकरण गाजले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी याच देशमुख यांच्या कुटुंबीयांची आज भेट घेतली. कुटुंबाशी संवाद साधला आणि त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली. गावकरी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थित त्यांनी ही घोषणा केली. तत्पूर्वी, त्यांनी देशमुख यांच्या कन्येला विचारले की, तुझी शिक्षणाची जबाबदारी घेतली तर तुझी शिक्षणासाठी बारामतीस येण्याची तयारी आहे काय? यावर तिने होकार दिल्यानंतर पवार यांनी हा निर्णय घेतला.
शरद पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर साधलेल्या संवादावेळी ते म्हणाले, राज्य सरकारने या पीडित कुटुंबास काही मदत जाहीर केली आहे. पण, सरकार मदत मिळाल्याने कुटुंबाचे दु:ख कमी होत नाही. या हत्या प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. ज्यामुळे हे सर्व घडवून आणणाऱ्या सूत्रधाराला धडा मिळेल. अशा प्रकारच्या घटना समाजास न शोभणाऱ्या आहेत. देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यासाठी हत्येच्या खोलात जाऊन तपास होणे गरजेचे आहे.
शरद पवार यांनी पुढे बोलताना म्हटले की, आपण सर्वांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उबे राहिले पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये जर आपण सामूहिक प्रयत्नांची भूमिका घतली तर, आपल्याला कोणीही आडवू शकत नाही. मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली आहे. मुलांचं अपूर्ण राहिलेले शिक्षण आम्ही पूर्ण करु. गेलेला मणूस तर परत येणार नाही. जे झालं आहे ते आपल्याला बदलता येणार नाही. पण आपण कुटुंबाला धीर देऊ शकते, असेही पवार म्हणाले.