
जळगाव, प्रतिनिधी | मोदी सरकार ईडी, सी.बी.आय., आय.टी. अशा खात्यांचा वापर विरोधकांना नामोहरम करण्यासाठी करीत आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल होणे हा त्यातलाच प्रकार आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी देशात एकत्र येणे गरजेचे आहे. असा आरोप आज (दि.२७) राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केला. ते जळगाव येथे जैन इरीगेशनच्या स्प्रिंकलर आणि ड्रीप सिस्टमची माहिती घेण्यासाठी आले होते.
गेहलोत पुढे म्हणाले की, भाजपमुळे देशातील वातावरण खतरनाक झाले आहे. देशात महागाई व बेरोजगारी वाढली आहे, असलेल्या नोकऱ्या सुटत आहेत. भाजपा मात्र त्याची चिंता न करता राष्ट्रवाद, धर्म व सैन्याचा पराक्रम यांचे राजकारण करून स्वत:चा फायदा साधत आहे, सध्या भाजपचा ग्राफ ठप्प झाला आहे, असा आरोप करतानाच गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलाच फटका बसल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्याचवेळी काँग्रेस हा तळागाळापर्यंत पोहोचलेला पक्ष असल्याचेही ते म्हणाले.
महात्मा गांधी, सरदार पटेल व डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा वापर करण्याचा भाजपाला अधिकार नाही, त्यांनी त्याबद्दल जनतेची माफी मागावी, असा दावाही त्यांनी केला. त्याचवेळी भाजपात जाणाऱ्या नेत्यांना अडवून काहीच फायदा नाही, असेही त्यांनी म्हटले. यावेळी सोहराबुद्दिन आणि प्रजापती यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल विचारलेल्या प्रश्नांना मात्र त्यांनी मला ही प्रकरणे माहित नाहीत, आठवत नाहीत, अशी उत्तरे दिली.