मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “शरद पवार यांना शिवसेना संपवायचीच होती, त्यांना माहित होते की, उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बनले की शिवसेना संपणार आणि झाले देखील तसेच !” अशा शब्दांमध्ये आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी टिकास्त्र सोडले.
शिवसेनेच्या आजच्या स्थितीबाबत अनेक नेते भाष्य करत आहेत. आज यावर माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार गिरीश महाजन यांनी भाष्य केले. टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी शिवसेनेतील आजच्या स्थितीला शरद पवार हेच जबाबदार असल्याचे ठासून सांगितले.
आ. गिरीश महाजन म्हणाले की, “गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. यातून आज शिवसेनेत उभी फूट पडली आहे. हा सर्व प्लॅन शरद पवार यांचा होता. त्यांनी उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्यास भाग पाडून शिवसेनेला पध्दतशीरपणे संपविले. यात संजय राऊत यांनी सुपारी घेऊन शिवसेनेला आजच्या स्थितीत नेल्याचा आरोप देखील त्यांनी केला. राऊत यांच्या बेछूट बोलण्याला सर्व जण कंटाळले होते.” तर, सध्याचे सरकार हे डबल इंजिनचे सरकार असल्याचेही आमदार गिरीश महाजन म्हणाले.