शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेंदुर्णी नगरपंचायतीच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून उपनगराध्यक्षपदी शरद बाबुराव बारी यांची निवड करण्यात आली आहे. नगरपंचायत निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक १६ मधून सर्वाधिक मतांनी विजयी होत दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या शरद बारी यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

आज शेंदुर्णी नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पूर्ण करण्यात आली. उपनगराध्यक्षपदी शरद बाबुराव बारी यांची निवड जाहीर होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

या वेळी नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय गरूड यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष शरद बारी यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. बैठकीस नगरपंचायतीतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. तसेच मुख्याधिकारी विवेक धांडे यांचीही उपस्थिती होती, ज्यामुळे सभेला प्रशासकीय महत्त्व प्राप्त झाले.
निवडीनंतर विविध पक्षांच्या नेत्यांनी शरद बारी यांचे अभिनंदन केले. लोकहिताचे प्रश्न सोडवणे, विकासकामांना गती देणे आणि सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. शेंदुर्णी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपनगराध्यक्षपदाच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका बजावण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.



