जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील नेरी नाका परिसरात रस्त्यावर उभे असतांना एकाच्या हातातून दुचाकीवरुन येवून मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या अजहर आलम अन्सारी (रा. कात्रज, पुणे, ह. मु. तांबापुर), फैजान खान आरिफ खान (रा. बिसमिल्ला चौक, तांबापुरा) यांच्यासह एक विधीसंघर्षीत बालकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा मोबाईल व एक चोरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली.
जळगाव शहरातील नेरीनाका परिसरात रस्त्यावर उभे राहून मोबाईल बघत असलेल्या राजू पुरुषोत्तम नारखेडे (रा. भवानी पेठ) यांच्या हातातून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मोबाईल हिसकावून ते पसार झाले होते. ही घटना २ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गेल्या महिन्यात अशा प्रकारचे मोबाईल स्नॅचिंगसह सोनसाळखी लांबविल्याच्या घटना रामानंद व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या होत्या. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला संशयिताच्या शोधार्थ रवाना केले होते.
गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी तपाचक्रे फिरवित तात्काळ शहरातील नेत्रमच्या पथकातील महेश वर्मा, पोकॉ मुबारक देशमुख, कुंदनसिंग बयास, पंकज खडसे मोहसीन शेख यांच्या मदतीने शहरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच पथकाला मिळालेल्या माहितीवरुन दोघ चोरट्यांच्या तांबापुरातून मुसक्या आवळल्या. दुचाकीवर येत मोबाईल लांबवणारे दोघे चोरटे अल्पवयीन मुलाच्या मदतीने मोबाईल लांबवित होते. तसेच त्यांच्याकडून सहा मोबाईलसह चोरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ विजय खैरे, पोकॉ अनिल कांबळे, राहुल घेटे, राहुल पाटील, योगेश साबळे, रविंद्र तायडे, मुकुंद गंगावणे यांच्या पथकाने केली.