अहमदनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । प्रसिद्ध धार्मिक स्थळ शनि शिंगणापूर येथील देवस्थान ट्रस्टच्या कार्यप्रणालीवर गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू असताना, अखेर जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई करत देवस्थानचे प्रशासकीय कार्यालय पोलिस बंदोबस्तात सील केले. जिल्हाधिकारी या कारवाईसाठी उपस्थित राहिले आणि हे संपूर्ण प्रकरण आता अधिकच गतीमान झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज सकाळी शनि शिंगणापूर मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयात अचानक पोलिस बंदोबस्तात धाड टाकण्यात आली. यावेळी कार्यालयात काही कर्मचारी उपस्थित असले तरी, कार्यकारी अधिकारी मात्र गैरहजर होते. विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आल्यानंतर येथे काही कागदपत्रांची हेराफेरी व पुरावे नष्ट करण्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळेच ही तातडीची आणि निर्णायक कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शनि शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गेल्या काही काळापासून आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार, अपारदर्शक कारभार यासारखे गंभीर आरोप होत होते. प्रशासनाने या तक्रारींची दखल घेतल्यानंतर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले होते. मात्र, यानंतर देखील काही पुरावे नष्ट केल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील अनर्थ टाळण्यासाठी कारवाईला प्राधान्य दिले.
कार्यालय सील करताना अनेक सामाजिक कार्यकर्ते, गावकरी आणि स्थानिक रहिवाशांची उपस्थिती होती. यामुळे मंदिर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिस बंदोबस्त असल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
या कारवाईनंतर आता शनि शिंगणापूर मंदिराचा संपूर्ण कारभार थेट शासनाच्या नियंत्रणाखाली राहणार आहे. पुढील काही दिवसांत या संदर्भातील अधिक तपशीलवार चौकशी व कागदपत्रांची छाननी होण्याची शक्यता असून, दोषी ठरलेल्या विश्वस्तांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



