जळगाव प्रतिनिधी । शहरातील कासमवाडी परिसरातील कब्रस्थानजवळ शाम दीक्षित या तरुणाच्या खून प्रकरणी तीन जणांना एमआयडीसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील कासमवाडी परिसरातील कब्रस्थानच्या पुढे आज पहाटे एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. याप्रसंगी पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये हा मृतदेह शाम दीक्षित (वय ३२) या तरूणाचा असल्याचे निष्पन्न झाले. शाम हा महसूल खात्यातील खासगी कामे करत होता. तसेच तो एका राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याची बाबसुध्दा समोर आली आहे.
पोलीस तपासात शाम दीक्षित याने चार जणांसह शहरातील बस स्थानक लगत असलेल्या एका हॉटेलमध्ये पहाटे दोन वाजेपर्यंत मद्य प्राशन केले होते. यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्री सोबत मद्यपान करणाऱ्या दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर ज्या तरुणावर खून केल्याचा संशय आहे. त्या तरुणाच्या भावाला देखील चौकशीसाठी पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे. दरम्यान, दगडाने ठेचून त्याची क्रूर हत्या करण्यात आल्यामुळे दोघांमध्ये टोकाचा वाद झाल्याचा संशय पोलिसांना आहे.