जळगाव प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात ‘श्रीं’च्या आगमनाची तयारी सुरू आहे. यंदाही पर्यावरण संवर्धनासाठी शाडूच्या गणेश मूर्तीसाठी जनजागृती करण्यात येत असून शाळांमध्ये मुलांसाठी प्रशिक्षणांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, शिव कॉलनी येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेत विद्यार्थ्यांना शाडूमाती गणपती प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यात चिमुकल्यांनी ५० रुपात गणपतीच्या मूर्ती बनविल्या. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल असे मार्गदर्शन ग. स. सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांना केले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, तसेच मोठ्या आकाराच्या मूर्तींमुळे विसर्जनाच्यावेळी होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारे असते. त्यामुळे त्याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी व्यक्त केले. याचबरोबर प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होते. याच पार्श्वभूमीवर विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागात पर्यावरणपूरक शाडूमातीपासून श्री गणेशमूर्ती निर्माण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उज्ज्वला सुरवाडे यांनी मुलांना याचे प्रशिक्षण दिले. त्यांचे स्वागत निवासीप्रमुख शशिकांत पाटील आचार्य यांनी केले. उज्ज्वला सुरवाडे यांनी शाडूच्या मूर्तीचा बेस कसा असावा, हात पाय कसे असावे गणपतीची लहान आभूषणे कशी तयार करावी याची माहिती दिली. बारीक कलाकुसरीची कामे, अलंकारिक कामे मुलांना शिकविली व करून दाखविली. या वेळी दुलारी प्रजापती, महेश कुळकर्णी, कृष्णा सत्रे, दीपक पाटिल, विनोद पाटील, माधव सोनवणे, विजय पाटील आदींचे सहकार्य लाभले.