यावल शहरातील पूर्णावादनगर मध्ये गटारीचे पाणी रस्त्यावर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल नगरपालिका हद्दीतील विस्तारीत भागातील पूर्णावाद नगर भागातील गटारीचे अपूर्ण बांधकाम असल्याने सांडपाणी रहदारीच्या रस्त्यावर वाहत आहे. ही बाब नगरपालिकेच्या लक्षात आणून देऊन देखील बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केला आहे. प्रशासनाने तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

याबाबतची मिळालेली सविस्तर माहीती अशी की, यावल नगरपालिका हद्दीतील विस्तारीत वसाहतीच्या भागातील पूर्णावाद नगर भागात नगरपरिषदेने यापूर्वी गटार बांधकाम केलेले आहे. परंतु सदरील गटार बांधकाम अर्धवट अवस्थेत केल्याने सांडपाण्याचा निचरा रिकाम्या प्लॉट वर होत आहे. ही बाब गेल्या दोन महिन्यापूर्वी नागरिकांनी अतुल पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे तत्काळ कारवाई व्हावी म्हणून नगरपालिका प्रभारी बांधकाम अभियंता यांच्याकडे तक्रार करून ती सोडविण्यात यावी. यासाठी प्रत्यक्ष बांधकाम विभागाचे कर्मचारी कामिल शेख व वार्षिक निविदा धारक ठेकेदार यांना त्या भागात बोलावून समस्या लक्षात आणून दिली होती.

ही समस्या अद्यापपर्यंत कायम आहे. गटारीतील सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली असून डास व मच्छर यांचे प्रमाण वाढले आहे. या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रस्त्याने पायी चालणे देखील मुश्कील झाले आहे. सदरचे काम तत्काळ कऱण्यात यावे अशी मागणी येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी प्रशासनाकडे केली असुन ती पूर्ण न केल्यास त्या भागातील नागरिकांसमोर नगरपालिके समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content