भुसावळ (प्रतिनिधी) भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह त्यांची दोन मुलं आणि एका कार्यकर्त्याचा काल रात्री निर्घुण हत्या झाली होती. दरम्यान, रात्रीपासून शहरात प्रचंड तणावाचे वातावरण असून सर्वत्र तगडा बंदोबस्त लावलेला असून सर्व मयतांवर आज दुपारी एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार होणार असल्याचे कळते.
या संदर्भात अधिक असे की, काल रात्री पावणेदहाच्या सुमारास रवींद्र बाबूराव खरात यांच्या कुटुंबावर हल्ला चढविण्यात आला. यात स्वत: रवींद्र बाबूराव खरात, त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात, मुलगा प्रेमसागर मुलगा रोहित आणि सुमीत गजरे हे ठार झाले आहेत. तर ऋत्वीक या मुलासह पत्नी आणि दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी पहिल्यांदा सुनील बाबूराव खरात यांच्यावर गोळीबार करून गुप्तीने वार केले. हा आवाज ऐकून रवींद्र खरात आणि त्यांचे कुटुंबिय घराबाहेर आले असतांना हल्लेखोरांनी त्यांच्याकडे मोर्चा वळविला. यात रवींद्र खरात यांच्यावर घराजवळ गोळीबार करण्यात आला. तर त्यांची मुले जीव वाचवण्यासाठी पळाली असतांना आरोपींनी त्यांचा पाठलाग करत रेल्वे हॉस्पीटलजवळ त्यांना गाठत त्यांनाही गाठत ठार मारले.
शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे. संभाव्य हाणामारीच्या भीतीने अनेक पालकांनी आज मुलांना शाळेत पाठवलेले नाही. तर पोलिसांनी शहराला जणू छावणीचे स्वरूप दिले आहे. सर्व मयतांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार होणार असल्याचे कळते. भुसावळ शहरात याआधी एकाच वेळी एकाच परीवातील इतक्या लोकांचे हत्याकांड कधीही घडलेले नाही. त्यामुळे भुसावळची गुन्हेगारी मुंबईपेक्षा अधिक भयावह झाल्याचे चित्र आहे.