पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील करमाड खुर्द गावात 19, 20 आणि 21 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात गावातील समस्त शेतकऱ्यांनी एकत्र येत पारोळा तहसीलदार महादेय यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या मते, प्रशासनाने 25 सप्टेंबर रोजी केलेले पंचनामे वस्तुस्थितीला धरून नाहीत. कारण ज्या दिवशी पंचनामा करण्यात आला, त्यावेळी पावसाचा काहीसा खंड पडल्यामुळे काही शेतांतील पाणी निचरा झाले होते. त्यामुळे प्रत्यक्षात ज्या पिकांचे नुकसान झाले, ते पंचनाम्यात नोंदवले गेले नाही. शेतकऱ्यांनी याला आक्षेप घेत स्पष्ट केले की, 19 ते 21 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर खूप होता आणि त्या काळात शेती संपूर्ण पाण्याखाली होती. परंतु पंचनामा 25 सप्टेंबरला झाल्यामुळे प्रत्यक्षातील हानी योग्य प्रकारे नोंदवली गेली नाही.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पंचनामे करताना ‘फक्त ज्या शेतात आजही पाणी साचले आहे, त्याचाच पंचनामा करता येईल’ असा प्रशासनाचा दृष्टीकोन योग्य नाही. अतिवृष्टीमुळे नुकसानीचा अंदाज त्या दिवशी नोंदवता आला नाही, यामुळे संपूर्ण गावातील शेती हानीच्या आकलनासाठी सरसकट पंचनामे होणे अत्यावश्यक असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे.
त्यातच, 27 आणि 28 सप्टेंबर रोजीदेखील पावसाचा जोर कायम राहिल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, शासनाकडून तातडीने आर्थिक मदतीसाठी अधिकृत पंचनाम्याची वाट पाहत आहे. त्यामुळे करमाड खुर्द येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना विनंती केली आहे की, संपूर्ण गावाच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू करावी.



