

जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात यंदाच्या हिवाळ्यात तापमानात सर्वाधिक घसरण नोंदवली जात असून, अनेक भागांमध्ये थंडीची तीव्र लाट जाणवत आहे. धुळे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पारा झपाट्याने खाली आला आहे. काही भागांत तर तापमान एक अंकी सेल्सिअसवर स्थिरावल्याने नागरिक अक्षरशः थरथर कापू लागले आहेत.
कोल्हापूरमध्ये यंदा प्रथमच तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, तर पुण्यात ७.९ अंशांची नोंद झाली. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत थंडीचा कडाका प्रकर्षाने जाणवत असून, रिक्षाचालक, सुरक्षा रक्षक आणि रात्रीच्या पाळीत काम करणाऱ्यांना शेकोटीचा आधार घ्यावा लागला. दिवसभरही थंडीची लाट कायम असून वातावरणात गारठा पसरलेला दिसत आहे.
आज दिनांक १२ रोजी मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून उर्वरित राज्यातही थंडी वाढून हुडहुडी कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत असल्याचे निरीक्षणात आले आहे. आज पहाटे दाट धुके पसरले होते आणि सकाळी आठपर्यंत गारठ्याची तीव्रता वाढलेली जाणवली. विशेषत: पुणे शहरात तापमानातील तीव्र घसरण कायम असल्याने नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडीची हीच स्थिती राहील, असे संकेत दिले आहेत.
परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि जेऊर येथे ५.५ अंश, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ६.१ अंश, धुळे आणि अहिल्यानगर येथे ६.६ अंश तर जळगावमध्ये ७ अंश तापमानाची नोंद झाली. पुणे आणि गोंदिया ८ अंशांखाली तर नागपूर, नाशिक, मालेगाव, यवतमाळ येथे ९ अंशांखाली पारा गेला आहे. वर्धा, सातारा आणि अकोला येथे तापमान १० अंशांच्या आसपास असल्यामुळे राज्यात सर्वत्र गारठा वाढत आहे.



