Home राज्य राज्यात वाढली कडाक्याची थंडी

राज्यात वाढली कडाक्याची थंडी


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये आणि सीमेपलिकडे असणा-या पर्वतीय क्षेत्राकडून शीतलहरींचा प्रवाह मागील काही दिवसांमध्ये वाढल्यामुळे हा प्रवाह आता महाराष्ट्रापर्यंत परिणाम दाखवताना दिसत आहे. तिथे दक्षिण भारतही हा शीतलहरींनी प्रभावित होताना दिसत आहे. उत्तरेकडून येणा-या गार वा-यांचा झोत वेगाने राज्यात येत असल्यामुळे नाशिक, विदर्भात तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. कोकणातील काही भागही इथे अपवाद ठरत नाही.

सध्याच्या घडीला राज्यात थंडीला पोषक हवामान असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा शेवट थंडीनेच होणार असल्याचा अंदाज आहे. तिथे नाशिकमध्ये तापमान १२.४ अंशांवर पोहोचले आहे, तर जळगावात १३.२ अंश सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये १३.२ अंश, साता-यात १४.५ अंश, कोल्हापुरात १७.२ अंश इतके तापमान आहे. विदर्भातही हीच स्थिती असून, नागपुरात पारा १३.६ अंश, गडचिरोली इथे १४ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार हिमालय क्षेत्रासह उत्तर भारतात पश्चिमी झंझावात अर्थात एक तीव्र थंड हवेचा झोत सक्रिय असल्यामुळे उत्तर भारतात थंडी वाढली आहे. याच उत्तर भारतीय राज्यांमधून येणा-या वा-यामुळे राज्यभरात थंडीचे प्रमाण वाढण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रामध्येही वातावरणात बदल झाले असून, किमान आणि कमाल तापमानात घट होताना दिसत आहे.

मागील काही दिवसांपासून आणि येत्या काही दिवसांमध्येही देशासह राज्यात थंडीसाठी पूरक वातावरण राहणार असून, महाराष्ट्रात शीतलहरींमध्ये अडथळे आणणारे कोणतेही घटक सक्रिय नसल्यामुळे गुलाबी थंडी बोच-या थंडीचे रूप धारण करू शकते. त्यातच आकाश निरभ्र असल्यामुळे पंजाब, हरियाणा आणि राजस्थान दरम्यान असणा-या हवेच्या उच्च दाब क्षेत्रामुळे ईशान्येकडून महाराष्ट्राकडे येणा-या थंड कोरड्या वा-यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.

फक्त पुणे, नाशिक, नागपूरमध्येच नव्हे, तर आता मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही हवेत गारवा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. असे असले तरीही मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पहाटेच्या वेळी गारवा आणि दुपारी उष्मा अशा विचित्र हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. पुढील ४८ तासांनंतर थंडीचे हे प्रमाण शहरासह राज्याच्या बहुतांश भागात आणखी वाढेल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


Protected Content

Play sound