यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील महेलखेडी येथील जिल्हा परिषद शाळेचे आदर्श व कर्तव्यनिष्ठ शिक्षकाच्या झालेल्या अन्यायकारक बदलीविरोधात ग्रामस्थ आमरण उपोषणास बसले होते. परंतू गटशिक्षण अधिकारी यांनी सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आज चौथ्या दिवशी उपोषणाची सांगता झाली.
महेलखेडी तालुका यावल येथील जिल्हा परिषद शाळेचे आदीवासी शिक्षक हमीद फकीरा तडवी यांची राजकीय दबावपोटी झालेली बदली तात्काळ रद्द करण्यात यावी. तसेच त्यांची परत महेलखेडी या ठिकाणी पुन्हा नियुक्ती करण्यात यावी, त्याचप्रमाणे मद्यपान, गुटखा खाऊन शाळेत येणारे आणि राजकीय दबावाचे राजकारण करणारे जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांच्यावर कारवाही व्हावी, या मागणींसाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरु होते. आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे राज्य अध्यक्ष एम.बी. तडवी यांच्या मध्यस्थीने व प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, गटशिक्षण अधिकारी एजाज शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे अखेर पंचायत समिती कार्यालयासमोरील उपोषणाची सांगता झाली.