जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांतील मोठा घोळ समोर आला असून, ग्रामीण मतदारांची हजारो नावे शहर विधानसभा मतदार यादीत आढळत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तर्फे करण्यात आला आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी यांनी १२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देऊन या प्रकाराची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम मनपा प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र तपासात असे दिसून आले आहे की जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील हजारो मतदारांची नावे जळगाव शहर विधानसभा यादीत समाविष्ट झाली आहेत. जळगाव शहराच्या चारी दिशांना ग्रामीण मतदारसंघ लागून असल्यामुळे ही गफलत केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या दुबार नावांमुळे बोगस मतदानाची शक्यता वाढत असून लोकशाही प्रक्रियेचा घात होऊ शकतो. अनेक वेळा ग्रामीण भागातील मतदार मतदानाच्या दिवशी टेम्पो आणि रिक्षांमधून शहरात आणले जातात, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. ज्या मतदारांचा जळगाव महानगरपालिकेशी कोणताही संबंध नाही, ते शहराच्या निवडणुकीत मतदान करत असल्यास हा लोकशाहीचा स्पष्ट अपमान ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीने जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट मागणी केली आहे की, ग्रामीण आणि शहर या दोन्ही विधानसभा मतदार याद्या त्वरित तपासून दुबार नावे वगळावीत. तसेच या प्रक्रियेसाठी महानगरपालिका आयुक्तांना जबाबदारी देऊन दोन्ही याद्या ताडून पाहाव्यात आणि पुनर्निरीक्षणानंतरच अंतिम यादी प्रसिद्ध करावी. याबाबत वेळेवर कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचाही इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या या निवेदनामुळे प्रशासनात खळबळ माजली असून, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षाने दिलेल्या या निवेदनानंतर जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



