मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या ‘राइट टू एज्युकेशन ॲक्ट 2009’ अंतर्गत गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा हक्क देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत मुक्ताईनगरमध्ये मोठा गोंधळ उडाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लॉटरी पद्धतीने झालेल्या प्रवेशात बोगस रहिवासी पत्त्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याचा आरोप होत असून, त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेक अर्जदारांनी खोटे किंवा चुकीचे रहिवासी पत्ते दाखवून प्रवेश मिळविल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप संतप्त पालकांकडून होत आहे. पालकांच्या मते, योग्य तपासणी आणि पडताळणी न केल्यामुळे हा प्रकार घडला असून, यामागे प्रशासनाची निष्क्रियता स्पष्ट दिसून येत आहे.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे Shri Eknathrao Khadse Talent School आणि Dr. Jagdish Patil English Medium School या दोन्ही शाळा गावापासून सुमारे २ ते ३ किलोमीटर अंतरावर आहेत. प्रत्यक्षात त्या परिसरात कोणताही रहिवास नसताना काही अर्जांमध्ये केवळ ८०० ते ९०० मीटर अंतर दाखवून प्रवेश मिळविण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर संशय निर्माण झाला आहे.
या प्रकारामुळे खऱ्या अर्थाने गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत पालक व्यक्त करत आहेत. बोगस अर्जांची सखोल छाननी न करता शिक्षण विभागाने डोळेझाक केल्याचा आरोपही जोर धरत आहे. “वेळीच योग्य तपासणी झाली असती, तर असा प्रकार घडला नसता,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात आली असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी वाढत आहे. शिक्षणाधिकारी या प्रकरणात ठोस कारवाई करणार की बोगस प्रवेशांना मूकसंमती देणार, असा सवाल उपस्थित होत आहे. संतप्त पालकांनी आंदोलनाचा इशाराही दिला असून, येत्या काळात या प्रकरणाला अधिक तीव्र वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



