जळगाव प्रतिनिधी । चोपडा आगारातील वाहकाचा कारणे दाखवा नोटीसीच्या धास्तीने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वाहकाच्या मृत्यूला महामंडळ प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप जळगाव आगारातील संतप्त संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
जिल्ह्यात तसेच राज्यात एसटी कर्मचार्यांचा गेल्या दोन अडीच महिन्यांपासून संप सुरू आहे. वेळोवेळी संघटनां, समिती, पदाधिकार्यांच्या चर्चा होवून काही अंशी पगारवाढ, महागाईभत्ता, घरभाडे भत्त्यात वाढ करूनही संपकरी कर्मचार्यांनी संप मागे घेतलेला नाही. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, यामागणीसाठी संपकरी चिवटपणे झुंज देत आहेत. परंतु यावर तोडगा न निघाल्याने प्रशासनाकडून संपकरी कर्मचार्यांवर सेवा समाप्ती, निलंबन, कारणे दाखवा नोटीस देत बडतर्फीची कारवाई केली जात आहे. अशाच कारणे दाखवा व नुकसानभरपाईच्या नोटीसीचा धसका घेतल्याने चोपडा आगारातील वाहकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. एसटी संपकरी कर्मचार्यांकडून राज्य शासन व प्रशासनाचा निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली.
जळगाव विभागात एसटी कर्मचार्यांचा संपास किमान ७० ते ८० दिवस झाले आहेत. विलीनीकरणासह मृत कर्मचार्यांच्या कुटूंबिंयांच्या बाबतीत राज्य सरकारकडून कोणतेही धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी वा कर्मचार्यांच्या हिताचा निर्णय अजूनही झालेला नाही त्यामुळे या कर्मचार्यांचा संप सुरू आहे. या संपात सहभागी असल्याच्या कारणामुळे या कर्मचार्यांना प्रशासनाकडून कारणे दाखवा तसेच महामंडळाचे आर्थीक नुकसान केले म्हणून नुकसानभरपाईची मागणीचे नोटीसी दिल्या जात आहेत. अशाच नोटीसीचा धसका घेतल्याने चोपडा आगारातील वाहक आर.के. वाणी यांचा सोमवारी १० जानेवारी रोजी हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना यापुर्वी एसटी महामंडळाने नुकसान भरपाईची नोटीस बजावण्यात आली होती.
दरम्यान वाणी यांच्या मृत्यूला एस.टी. महामंडळाचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप जळगाव आगारातील संपकरी कर्मचार्यांनी केला आहे. कामाचा व्याप पहाता अत्यंत तोकडे वेतन, इतर राज्यांच्या परिवहन सेवेतील कर्मचार्यांच्या मानाने देखिल वेतन कमी आहे, तसेच आर्थीक ताणतणाव वा अन्य कारणामुळे आतापर्यंत जळगाव जिल्हयात ४५ ते ४८ एसटी कर्मचार्यांचा आत्महत्या वा संसर्ग प्रादूर्भावामुळे मृत्यू झाला आहे. या मृत कर्मचार्यांच्या कुटूंबियांना शासनस्तरावरून कोणतीही मदत मिळालेली नाही ती मदत आणि एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण केले जावे या मागणीसाठी एसटी कर्मचार्यांचा संप सुरूच असल्याचे चित्र आहे.
जळगाव विभागात एसटीचे परिवहन विभागात ४२७२ कर्मचारी वाहक, चालक यांत्रीकी प्रशासकिय असे विविध ठिकाणी कार्यरत आहेत. त्यापैकी ७५६ कर्मचारी कामावर हजर आहेत. ५५ जणांची साप्ताहीक सुटी वा दौरा तर १२९ जण प्रशासकिय रजेवर आहेत. तर उर्वरीत सुमारे ३३४६ च्यावर कर्मचारी संपात सहभागी आहेत. या संपात सहभागी असल्यामुळे एसटी प्रशासनाकडून आतापर्यत ३६६ संचित कर्मचार्यांचे निलंबन, संचित ८६ कर्मचार्यांची सेवासमाप्ती, संचित ३९ कर्मचार्याच्या प्रशासकीय बदल्या, १०४ संचित कर्मचार्यांना बडतर्फ नोटीस तर संचित ८८ कर्मचार्यांवर बडतर्फ कारवाई आली आहे.