Home Cities पारोळा पत्रकार भवन बांधकाम समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार भिका चौधरी

पत्रकार भवन बांधकाम समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार भिका चौधरी


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा येथील लोक दर्पण पत्रकार असोसिएशनच्या वतीने शहरात नियोजित पत्रकार भवन उभारणी आणि त्यासाठी आवश्यक निधी संकलित करण्याच्या दृष्टीने एका महत्त्वाच्या समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली. या बांधकाम समितीच्या अध्यक्षपदी पारोळ्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक ‘पारोळा भूषण’चे संपादक व माजी नगरसेवक भिका चौधरी यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली आहे.

६ डिसेंबर रोजी पारोळा येथील विश्रामगृहामध्ये लोक दर्पण पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील आणि उपाध्यक्ष भूपेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत ही महत्वपूर्ण बैठक पार पडली. अमळनेर रोडवरील नियोजित जागेवर पत्रकार भवन लवकरात लवकर उभे करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली.

या नवनिर्वाचित समितीमध्ये उपाध्यक्षपदी बाळू पाटील, सचिवपदी दिलीप सोनार, तर सदस्य म्हणून योगेश पाटील, प्रतीक मराठे, प्रकाश पाटील आणि प्रदीप पाटील यांची निवड करण्यात आली आहे बैठकीदरम्यान संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच, संघटनेच्या जमा-खर्चासह इतर महत्त्वाच्या बाबींवर काही पत्रकारांनी आपले मत मांडले. ही संपूर्ण बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

नवनिर्वाचित बांधकाम समितीचे अध्यक्ष भिकाभाऊ चौधरी यांनी यावेळी सर्व पत्रकारांचे आभार मानले. “येणाऱ्या काही कालावधीतच आपण पत्रकार भवन बांधण्याचे कार्य सुरू करण्याचा प्रयत्न करू. या कार्यासाठी मला सर्व पत्रकार बांधवांची एकता, एकजूट आणि सक्रिय सहकार्याची अपेक्षा आहे,” असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह अभय पाटील, रमेश जैन, संजय पाटील, दीपक भावसार, राकेश शिंदे, अशोक ललवाणी, आबा महाजन, जितेंद्र वानखेडे, बापूसाहेब वाडीले, मच्छिंद्र पाटील यांसह अनेक पत्रकार उपस्थित होते. बैठकीचे आभार प्रदर्शन रमेशकुमार जैन यांनी केले.


Protected Content

Play sound