ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचे निधन

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या आणि निराधार महिला व मुलांसाठी सेवा कार्य उभ्या करणाऱ्या समाजसेविका शोभना रानडे (वय ९९) यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. सामाजिक कार्यासाठी केंद्र सरकारने २०११ मध्ये रानडे यांचा पद्मभूषण किताबाने गौरव केला होता. शोभना रानडे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९२४ रोजी पुण्यात झाला होता. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांची आगाखान पॅलेस येथे महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली. ही भेट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्यांच्या भेटीने शोभना यांनी आयुष्यभर गांधीवादी आदर्श स्वीकारले.

रानडे यांचे जीवन निराधार स्त्रिया आणि बालकांसाठी समर्पित होते. आसाममधील उत्तर लखीमपूर येथे १९५५ मध्ये त्या विनोबा भावे यांच्यासमवेत पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. मैत्रेयी आश्रम आणि शिशु निकेतनमधील पहिले बाल कल्याण केंद्र स्थापन करण्यात त्यांनी मदत केली. त्यांनी नागा महिलांना चरखा विणण्याचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबविण्यासाठी आदिम जाति सेवा संघ ही मोहीम सुरू केली . १९७९ मध्ये पुण्यात परतल्यानंतर आगाखान पॅलेस येथे असलेल्या गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी आणि प्रशिक्षणासाठी एक संस्था स्थापन करण्यात मदत केली.

गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या नेतृत्वाखाली रानडे यांनी १९९८ मध्ये कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय ही निराधार महिलांसाठी एक संस्था सुरू केली. त्याद्वारे महिलांना व्यापार आणि कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी पुण्यातील सासवड येथे स्थापन केलेला बालगृह आणि बालसदन हा आणखी एक बालकल्याण प्रकल्प सुरू केला. गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या माध्यमातून गंगा वाचवा चळवळ , गंगा नदीला प्रदूषणापासून वाचवण्याच्या मोहिमेमध्ये रानडे यांचाही सहभाग होता.

Protected Content