मुंबई-वृत्तसेवा | भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आज संपला आहे. १९८० च्या दशकात आपल्या सौम्य आवाजाने आणि अचूक हिंदी उच्चारांनी प्रत्येक घरात आपली ओळख निर्माण करणाऱ्या दूरदर्शनच्या ज्येष्ठ वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने माध्यमविश्वात शोककळा पसरली आहे.
साधेपणा आणि प्रतिष्ठेचे प्रतीक असलेल्या डीडीन्युजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. “सरला माहेश्वरी या दूरदर्शनसाठी एक आदरणीय आणि प्रतिष्ठित वृत्तनिवेदिका होत्या. त्यांच्या सौम्य आवाजाने, स्पष्ट उच्चारांनी आणि सन्माननीय सादरीकरणाने त्यांनी भारतीय वृत्तनिवेदन क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले,” असे डीडी न्यूजने म्हटले आहे.

ज्या काळात वृत्तनिवेदन हे केवळ बातमी वाचन नव्हते, तर विश्वासार्हतेचे प्रतीक मानले जात होते, त्या काळात सरला माहेश्वरी यांनी आपल्या संयत आणि मर्यादित शैलीतून प्रेक्षकांच्या मनात विश्वासाचे नाते निर्माण केले. त्यांच्या सादरीकरणात दिखाऊपणा नव्हता, तर गांभीर्य आणि स्पष्टता होती.
माहितीनुसार, त्या बऱ्याच काळापासून पार्किन्सन आजाराने त्रस्त होत्या. पार्किन्सन हा मेंदूतील ‘सबस्टॅन्शिया निग्रा’ भागातील डोपामाइन निर्माण करणाऱ्या पेशींवर परिणाम करणारा विकार आहे. यामुळे हातापायांना थरथर, स्नायू कडक होणे, संतुलन बिघडणे तसेच बोलणे आणि लिहिण्यात अडचणी निर्माण होतात. कौटुंबिक सूत्रांच्या माहितीनुसार, फिरायला जाऊन घरी परतताना पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या निधनानंतर माजी सहकाऱ्यांनी भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. “त्या केवळ चेहऱ्यानेच नव्हे तर मनानेही सुंदर होत्या,” अशा शब्दांत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करण्यात आले. भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.
दिल्ली विद्यापीठमधून पीएचडी पूर्ण केल्यानंतर त्यांनी दूरदर्शनमध्ये कार्यास सुरुवात केली. तब्बल तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी कृष्णधवल प्रसारणापासून रंगीत दूरदर्शनच्या युगापर्यंतचा प्रवास अनुभवला.
सरला माहेश्वरी यांचे योगदान भारतीय वृत्तनिवेदन क्षेत्रात सदैव स्मरणात राहील. त्यांच्या शांत, संयमी आणि विश्वासार्ह आवाजाची उणीव दूरदर्शन प्रेक्षकांना कायम जाणवत राहील.



