जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचे पंचनामे प्रशासकिय स्तरावर सुरू आहेत. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदती मिळावी असा प्रस्ताव राज्यपालांना पाठविण्याचा ठराव आजच्या स्थायी समिती सभेत पारित करण्यात आला.
जिल्हा परिषदेची गेल्या महिन्यातील तहकुब सभा आज शनिवार १६ नोव्हेंबर रोजी जि.प. अध्यक्षा उज्वला पाटील आणि उपाध्यक्ष नंदु महाजन उपस्थित नसल्याने सदरची तहकुब सभा शिवसेनेचे गटनेता रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला नानाभाऊ महाजन, प्रताप पाटील या दोन सदस्यांसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणदीवे व विभाग प्रमुख उपस्थित होते.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याचा प्रस्ताव राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असल्याने राज्यपालांकडे पाठविण्याचा ठराव करण्यात आला. यापूर्वी रूग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ मदत दिली जात होती. परंतु, राज्यात मुख्यमंत्री नसल्याने ही मदत मिळत नसल्याने रूग्णांना तात्काळ मदत राज्यपाल सहाय्यता निधीतून उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात यावा असा ठराव देखील सभेत करण्यात आला. या अतिवृष्टीमध्ये जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतींचे देखील नुकसान झाले असून यात रूग्णालय, शाळा, अंगणवाडी यांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यामुळे जि.प. मालकीच्या नुकसान झालेल्या मालमत्तांचे पंचनामे करण्याचे आदेश जि.प. प्रशासनाने काढून यासंदर्भातील माहिती ६ डिसेंबरपर्यंत सादर करण्याच्या सुचना विभाग प्रमुखांना देण्यात आल्या. दरम्यान, स्थायी समितीची तहकुब सभा एक वाजता असताना पदाधिकारी व स्थायीचे सदस्य उपस्थित नव्हते. तहकुब सभा घेण्यासाठी कोरमची आवश्यकता नसल्याने सभागृहात उपस्थित रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नानाभाऊ महाजन व प्रताप पाटील यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. यानंतर नियमित सभेचे कामकाज अडीच वाजता उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यात विषय सुचीवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.