नवी दिल्ली प्रतिनिधी । राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाबाबत संभ्रम निर्माण झाला असून प्रियंका गांधी यांच्या हाती काँग्रेसचं नेतृत्व सोपवण्यात यावं, ही मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पक्षाचे वरिष्ठ नेते शशी थरूर आणि के. सी. वेणुगोपाल यांनी प्रियंका यांच्या नावासाठी आग्रह धरल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही या मागणीचे समर्थन केले आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार व नेते शशी थरूर यांनी रविवारी प्रियंका गांधी यांच्याकडे काँग्रेसचं नेतृत्व सोपवण्याची मागणी केली होती. सद्यस्थितीत अध्यक्षपदासाठी प्रियंका यांच्यापेक्षा चांगला पर्याय पक्षाकडे असूच शकत नाही, असे थरूर म्हणाले होते. त्यानंतर के. सी. वेणुगोपाल यांनीही थरूर यांच्या मागणीचे समर्थन केले होते. प्रियांका गांधी यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपद सोपवण्याबाबत विचारले असतांना, अमरिंदर यांनी या मागणीचं स्वागत केलं. प्रियंका या काँग्रेस अध्यक्षपदासाठी ‘एक्सलंट चॉइस’ ठरतील. संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठिशी उभा राहील, असा विश्वास कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला. प्रियंका यांच्याबाबत राहुल गांधी यांनी निर्णय घ्यायला हवा, असे मतही त्यांनी नोंदवले.