जळगाव, राहूल शिरसाळे | गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आज पुन्हा सर्वपक्षीय नेत्यांनी एकोप्याचा नारा देत सर्वपक्षीय पॅनल बनविण्याचे संकेत दिले आहेत. तर पालकमंत्र्यांनी दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार सर्व पक्षांना आलटून-पालटून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता देखील यातून अधोरेखीत झाली आहे.
लवकरच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होऊ घातली आहे. २०१५ सालच्या मध्यावर झालेल्या निवडणुकीत तेव्हाचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या पुढाकाराने ही निवडणूक सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून लढविण्यात आली होती. यानंतर अध्यक्षपदी रोहिणी खडसे तर उपाध्यक्षपदी आ. किशोरआप्पा पाटील यांनी सुमारे सहा वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. यानंतर आता निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्वपक्षीय नारा बुलंद करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अजिंठा विश्रामगृहात सर्व पक्षातील दिग्गज नेत्यांची बैठक झाली होती. यात काही निष्कर्ष निघाला नव्हता. या अनुषंगाने आज येथेच पुन्हा बैठक झाली.
या बैठकीला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आ. गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे, आ. शिरीष चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. बराच वेळ खल झाल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास ही बैठक संपली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना आ. गिरीश महाजन यांनी एक-दोन जागेवर मतभेद असले तरी ते दूर होऊन सर्वपक्षीय पॅनल होणार असल्याचे सांगितले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद हे चारही पक्षांना मिळणार असून यासाठी प्रत्येकी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला तयार करण्यात आल्याची माहिती दिली. त्यांनी देखील निवडणूक सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातूनच लढविण्यात येणार असल्याचे सांगितले. तर एकनाथराव खडसे यांनी सहकारात राजकारण असू नये या भूमिकेतून पुन्हा सर्वपक्षीय पॅनल लढणार असल्याचे सांगितले.
या सर्व बाबींचा विचार करता, आगामी जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल आकारास येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही जागांवर इतर उमेदवार देखील अर्ज भरण्याची शक्यता असल्याने निवडणूक भलेही बिनविरोध होणार नसली तरी सर्वपक्षीय पॅनलच यात सत्ता काबीज करेल असे आज तरी स्पष्ट झालेले आहे.