नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना रसद पोहचविणाऱ्या आणि आयएसआयशी कनेक्शन असलेल्या जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे.त्यात मीरवाइज उमर फारूखसह अब्दुल गनी बट्ट, हाशिम कुरैशी, बिलाल लोन आणि शब्बीर शाह या पाच फुटीरतावादी नेत्यांचा समावेश आहे. शिवाय त्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी गाड्याही काढून घेतल्या जाणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत या पाच फुटिरतावादी नेत्यांना यापुढे संरक्षण मिळणार नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
फेब्रुवारी 2018 मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेत एक अहवाल सादर करण्यात आला होता. त्यामध्ये काश्मीरच्या फुटिरतावादी नेत्यांवर होणारा वार्षिक खर्च 10.88 कोटी रुपये असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा राज्यातील एकूणच व्हीव्हीआयपींवर खर्च होणाऱ्या निधीचा 10 टक्के भाग आहे. त्यातही फुटिरतावादी नेता मिरवैझ उमर फारुकच्या संरक्षणावर सर्वात जास्त खर्च केला जातो. त्याच्या सुरक्षेसाठी डीएसपी रँकचे अधिकारी तैनात असतात. त्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या अधिकारी जवानांवर गेल्या 10 वर्षांत 5 कोटी रुपये खर्च झाले आहेत.