जळगाव– लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 रविवार, दि. 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत जळगाव शहरातील एकूण 23 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी प्रशासनातर्फे “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच परीक्षेच्या पवित्रतेला धक्का लागू नये, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

या आदेशानुसार परीक्षा सुरू झाल्यापासून ते परीक्षा संपेपर्यंत प्रत्येक परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, परीक्षार्थी, नियुक्त अधिकारी-कर्मचारी, पोलीस व होमगार्ड यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
तसेच, सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “कॉपीमुक्त अभियान” प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने हे आदेश जारी करण्यात आले असून, सर्व संबंधितांनी त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.



