बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात ७ मेगावॅट क्षमता असलेला मेहकर तालुक्यातील बोरी सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ३३ केव्ही उखळी उपकेंद्राअंतर्गत ८३० शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याची सोय झाली आहे. तथापि पळशी बुद्रूक येथील ५ मेगावॅट सौर प्रकल्प (५ ऑक्टो) सुरू झाल्यामुळे त्या प्रकल्पातून परिसरातील ७०० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा,अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात ६७ विकेंद्रीत सौर प्रकल्पातून ५२ उपकेंद्रासाठी १९६ मेगावॅट वीज निर्मित करण्यात येणार आहे. त्यातील पळशी बुद्रूक आणि बोरी असे दोन प्रकल्प सुरू झाले आहे.त्यामुळे या दोन प्रकल्पातून १ हजार ५३० शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार आणि दिवसा वीज द्यायला सुरूवात झाली आहे.तथापि जिल्ह्यातील बोरी सौर प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिने जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात आले.
मेघा इंजिनिअरींग या विकासकाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेला मेहकर तालुक्यातील बोरी हा सौर प्रकल्प ७ मे.वॅ.क्षमतेचा असून ३५ एकर शासकीय जमिनिवर उभारण्यात आला आहे,तसेच २५ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आलेला बुलडाणा तालुक्यातील पळशी बुद्रूक येथील प्रकल्प ५ मे.वॅ.क्षमतेचा आहे.