
जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील ममुराबाद येथील तरुण गिरणा नदी पात्रात वाहून गेला असून त्याचा शोध सुरु आहे.

गणपती विसर्जनासाठी गेलेला गणेश गंगाधर सोनावणे (२५, रा. ममुराबाद, ता. जळगाव) हा तरुण गिरणा नदीपात्रामध्ये वाहून गेला. या तरुणाचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे. ही घटना शनिवारी (६ सप्टेंबर) संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास निमखेडी शिवारात नवीन बायपास लगत घडली.
अनंत चतुर्दशीला, ६ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाला सर्वत्र निरोप दिला जात असताना ममुराबाद येथील कोळी कुटुंबदेखील घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी निमखेडी शिवारात गिरणा नदी पात्रामध्ये गेले होते. या ठिकाणी गणेश सोनावणे (कोळी) हा तरुण गणपती मूर्ती घेऊन नदीपात्रात गेला. त्यावेळी त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह वेगात आहे. त्यामुळे गणेश कोळी हा तरुण पाण्यात बुडाला व बेपत्ता झाला.
घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनंत अहिरे, पोलिस नाईक प्रकाश चिंचोरे, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन व अन्य विभागांना माहिती देऊन दिली. तरुणाचा नदीपात्रामध्ये शोध घेतला जात आहे.



