सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; शंभर-दोनशेचा स्टॅम्प बंद

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी महायुती सरकारने राज्यामध्ये १२०० हून अधिक शासन निर्णय जाहीर केले आहेत. तत्पूर्वी, लाडकी बहीण योजना राबवली गेली आहे. या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत. मात्र याचा मोठा बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे आता हा पडलेला खड्डा भरून काढण्यासाठी मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला त्याहून अधिक मोठा खड्डा पडणार आहे. आजपासून १०० रुपयांच्या कामासाठी ४०० अधिक मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, आजपासून (१६ ऑक्टोबर) शंभर रुपये आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक बंद करून थेट आता पाचशे रुपयांच्याच मुद्रांकावर सर्व व्यवहार करावे लागणार आहेत. त्यामुळे शंभर आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक बंद केल्याने सर्वसामान्यांना किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा पाचशे रुपयांचा स्टॅम्प घेऊनच व्यवहार करावा लागणार आहे.

सर्वसाधारणपणे प्रतिज्ञापत्र, भाडे करार, विविध कर्ज प्रकरणासाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिक कामांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, संचकारपत्र, विक्री करार अशी कामे शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर केली जात होती. मात्र आता त्याच कामासाठी चारशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. हक्क सोडपत्रसाठी दोनशे रुपयांचा स्टॅम्प वापरला जातो. आता त्यासाठी पाचशे रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीला दिले किती, खिशातून जाणार किती असाच प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.

Protected Content