मुंबई (वृत्तसंस्था) जवान असो की शास्त्रज्ञ, प्रत्येक जण आपली कामगिरी बजावत असतो. त्यांना सरकारच्या पाठबळाची गरज असते. हे पाठबळ सरकार देत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. देशाची प्रतिमा उंचवण्याचे काम या शास्त्रज्ञांनी केलेले आहे, अशा शब्दात वैज्ञानिकांनी अंतरिक्षात 300 किमी दूर ‘लो अर्थ ऑरबिट लाइव्ह सॅटेलाइट’ला तीन मिनिटांत पाडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैज्ञानिकांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.
टायमिंगला कधीच टायमिंग नसते. निवडणुका येत-जात असतात, देशाची प्रगती थांबता कामा नये. कोण याकडे कुठल्या नजरेने पाहते यावर सगळे अवलंबून आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. भारताने मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडला आहे. अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्याने उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाइटचा वेध घेतल्यानं भारताला अवकाश संशोधन क्षेत्रात मोठं यश मिळालं आहे. यावेळी मोदींनी या क्षेपणास्त्राची निर्मिती करणाऱ्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.