यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल वनविभागाच्या कार्यपद्धती, संवर्धन उपक्रम आणि सातपुडा पर्वतरांगांतील जैवविविधतेचा आढावा घेण्यासाठी विविध नामांकित संस्थांतील शास्त्रज्ञांनी मंगळवारी (दि. १७) भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यामुळे स्थानिक प्रजातींचे जतन, बीजसंकलन व संशोधन उपक्रमांना नवे बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
महाराष्ट्र जीन बँक प्रकल्पाच्या संचालक मा. श्रीमती पुनम पाटे, यावल-जळगाव विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे येथील शास्त्रज्ञ व्ही. एस. राव, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ मिलिंद सरदेसाई यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे, आँचल सोनकुसरे, सौरभ वाळके आणि अन्य कर्मचाऱ्यांसमवेत वनविभागाच्या विविध प्रकल्पांची पाहणी केली.

दौऱ्यादरम्यान पथकाने सर्वप्रथम यावल येथील मध्यवर्ती रोपवाटिकेस भेट दिली. येथे विविध वृक्षप्रजातींची उपलब्धता, त्यांचा लागवड कालावधी, बीज संकलन व साठवण प्रक्रिया, अंकुरण कालावधी, स्थानिक व दुर्मीळ प्रजातींची निवड याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. औषधी वनस्पतींचे संवर्धन, खोड-कलम पद्धतीने वाढविण्यात येणाऱ्या प्रजाती तसेच स्थानिक गवतांच्या लागवडीसाठी योग्य स्थळांची निवड यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.
यानंतर पथकाने मोर धरण परिसराला भेट देत विविध वृक्ष, पक्षी व वन्यप्राण्यांचे निरीक्षण केले. मोर नदी परिसरातील गवतांच्या विविध प्रजाती, वनस्पती वैविध्य आणि प्राणीजीवनाचा प्रत्यक्ष अभ्यास करत सातपुडा पर्वतरांगांतील समृद्ध जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी स्थानिक प्रजातींचे संवर्धन आणि शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या भेटीमुळे यावल वनविभागाच्या संवर्धन, संशोधन व स्थानिक जैवसंपत्ती जतन उपक्रमांना नवे दिशा मिळणार असल्याची भावना वनप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनामुळे सातपुडा परिसरातील जैवविविधतेचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.



