जळगाव प्रतिनिधी । जळगाव पिपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचालित शहरातील पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तसेच त्यांच्या भौतिक व शैक्षणिक विकास व्हावा, या हेतूने विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून शाळेत आज (दि.24) शाळेच्या अभ्यासक्रमास धरून सामान्य ज्ञान आणि विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन जळगाव सिटी मॉन्टेसरीच्या संचालिका प्राची चौबे यांच्याहस्ते करण्यात आले. प्रदर्शनात नर्सरीतील सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी पाण्याचे शैक्षणिक स्त्रोत, प्राणीसंग्रहालय, जंगली पाळीव प्राणी आणि जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाणी अशा विविध विषयांचे प्रकल्प सादर केले. तसेच पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी पवनचक्की, सौरऊर्जा, जलचक्र, ज्वालामुखी, स्नायू द्रव व वायू वायुरूप पदार्थांच्या अवस्था झाडांचे अवयव यांसारख्या विविध विषयांचे प्रकल्प सादरीकरण केले.
कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका छाया पाटील, संस्थेचे व्यवस्थापक संतोष नवगाळे उपस्थित होते. प्रदर्शनात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चौबे तसेच विद्यार्थ्यांचे पालक व परिसरातील नागरिकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे व शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रदर्शन प्रमुख म्हणून हर्षद पाटील व मनीषा पाटील यांनी हे काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीसाठी शाळेची सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.