नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा कहर बघता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. एवढेच नव्हे तर, पूर पाहण्यास गर्दी केल्यास गुन्हे दाखल होणार असल्याचेही प्रशासनाने जाहीर केले आहे.
नाशिकमध्ये आतापर्यंत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. नाशकात गेल्या २४ तासांमध्ये ११८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच त्र्यंबकेश्वरला ३१५, तर इगतपुरीत २२० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. नाशितक-मुंबई आणि नाशिक-औरंगाबाद मार्गांवर वाहनांचो खोळबा झाला आहे. त्याच प्रमाणे नाशिक-त्र्यंबक आणि नाशिक-पेठ मार्गांवरही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमा होणे सुरू झाल्यानंतर प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घेतली आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नागरिकांनी गर्दी करू नये,असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शिवाय पूर पाहण्यास गर्दी केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही प्रशासनाने नागरिकांना दिला आहे. तर सोमेश्वर, त्रंबकेश्वर, गंगापूर परिसरसह दुगारवाडी, भावली धबधबा, पहिने, पेगलवाडी नेकलेस धबधबा या ठिकाणी पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे.