Home Cities यावल शाळेच्या गेट व भिंतीचे काम ४ वर्षांपासून रखडले; विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर, पालकांमध्ये...

शाळेच्या गेट व भिंतीचे काम ४ वर्षांपासून रखडले; विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर, पालकांमध्ये संताप


यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी। तालुक्‍यातील दहिगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या संरक्षण भिंतीचे आणि मुख्य प्रवेशद्वाराचे काम गेल्या चार वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत पडून आहे. संबंधित ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा आता रामभरोसे झाली असून, संतप्त पालकांनी पंचायत समितीकडे धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत २०२०-२१ या वर्षात ग्रामपंचायत व शासनाच्या माध्यमातून संरक्षण भिंत (कम्पाउंड वॉल) आणि शाळेचे गेट बसवण्याचे काम मंजूर झाले होते. मात्र, संबंधित ठेकेदाराने हे काम अर्धवट अवस्थेत सोडून दिले आहे. भिंत नसल्यामुळे शाळेच्या आवारात मोकाट जनावरे आणि बाहेरील व्यक्तींचा वावर वाढला असून, यामुळे शैक्षणिक वातावरणासह विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात अलीकडच्या काळात शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेल्या काही दुर्दैवी घटनांमुळे पालकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. अशातच शाळेला साधी भिंत आणि गेट नसल्याने आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेचे काय? असा प्रश्न पालक विचारत आहेत. वारंवार तक्रारी करूनही पंचायत समितीचा शिक्षण विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

शाळा व्यवस्थापन समितीने या गंभीर प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. समितीचे अध्यक्ष जफर खान पठाण व सचिव शेख कुदबुद्दीन यांनी यावल पंचायत समितीच्या गटाविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले.


Protected Content

Play sound