यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ जळगाव जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना वेळेवर मिळावा, यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, यावल यांच्याद्वारे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे.
महाडीबीटी (MahaDBT) या ऑनलाइन पोर्टलद्वारे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० जून २०२५ पासून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी तसेच संबंधित महाविद्यालयांनी तातडीने अर्ज सादर करावेत, असे या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे.

प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षातील अनुक्रमे १४७ व ५३९ शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालय स्तरावर अजूनही प्रलंबित आहेत. हे सर्व अर्ज २५ जुलै २०२५ पूर्वी शासननिर्णयाच्या अधीन राहून निकाली काढण्याचे निर्देश प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले आहेत. याव्यतिरिक्त, मागील शैक्षणिक वर्षांमध्ये अर्ज न करू शकलेल्या विद्यार्थ्यांनी देखील ३१ जुलै २०२५ पर्यंत आपले अर्ज सादर करून प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. अन्यथा, शिष्यवृत्तीच्या वाटपात अडचणी येऊ शकतात, असेही कळविण्यात आले आहे.
प्रकल्प अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या स्तरावरून या योजनेची व्यापक जनजागृती करावी. सोशल मीडिया, सूचना फलक, बैठका आणि इतर प्रभावी माध्यमांतून प्रचार करून अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.



