तालुका सुविधा केंद्रातील कंत्राटी नियुक्त्यांमध्ये घोटाळा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तक्रार

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या तालुका सुविधा केंद्रांमध्ये झालेल्या कंत्राटी नियुक्त्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी कामगार आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तालुका स्तरावर सुरू करण्यात आलेल्या सुविधा केंद्रांमध्ये व्यवस्थापक, लिपिक आणि शिपाई अशा पाच पदांसाठी नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, या नियुक्त्यांमध्ये शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता न पाहता, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून नियमबाह्य भरती केल्याचा आरोप आहे.

जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय भ्रष्टाचारासाठी कुप्रसिद्ध असल्याचे सांगत, काही अधिकाऱ्यांनी कोट्यवधींची माया जमवल्याचे पुरावे मंत्रालय व कामगार विभागाकडे सादर करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या कार्यालयाकडून केलेल्या नियुक्त्या काही महिन्यांतच रद्द करण्यात आल्या आहेत. दोन-तीन महिन्यांचा पगार घेतल्यानंतर पात्रता नसलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची नामुष्की सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर ओढवली आहे.

कामगार विभागातील भ्रष्टाचाराचा पुरावा म्हणून, बांधकाम मजूर नोंदणीसाठी लागणारा लॉगिन आयडी पासवर्ड नाशिक उपायुक्त कार्यालयात हस्तांतरित करण्यात आला होता. मात्र, तो पुन्हा दोन वर्षांनी जळगाव कार्यालयात आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागल्याची चर्चा आहे. या खर्चाच्या वसुलीसाठीच सुविधा केंद्रांवर अपात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.

तालुका सुविधा केंद्रातील नियमबाह्य भरती आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक तसेच राजकीय संघटनांकडून केली जात आहे. केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून ही कारवाई थांबता कामा नये, तर त्यांची नियुक्ती करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कामगार आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Protected Content