ज्याला जे म्हणावे ते म्हणा ! : अजितदादांनी सोडले मौन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपल्या वक्तव्यावरून अकारण वाद निर्माण करण्यात आल्याचे नमूद करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणावर मौन सोडत भूमिका स्पष्ट केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद रंगले आहेत. कालच शरद पवार यांनी यावर भाष्य केले होते. त्यांनी सांगितल्यानुसार आज अजित पवार यांनी या विषयाच्या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या संदर्भात आज अजित पवार म्हणालेत की, मी आत्तापर्यंत कुठल्याही महापुरूषांच्या विरोधात चुकीचं काहीही बोललो नाही. त्याआधी आम्ही जो महामोर्चा काढला त्यावेळी राज्यपालांनी महापुरूषांविषयी बेताल वक्तव्यं केली होती. माझं पद हे मला भाजपाने दिलेलं नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेने दिलं. संभाजीराजेंविषयी मी काहीही चुकीचं बोललो नव्हतो. मी वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केलं, त्यांच्या नेत्यांनी केलं. तसंच शरद पवार यांनी जे सांगितलं आहे त्या मताशीही मी सहमत आहे. संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक असून ज्यांना कुणाला धर्मवीर म्हणायचे असेल त्यांनी तसे म्हणावे ! असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार पुढे म्हणाले की, तुम्ही जर तुमच्या मोबाइलमध्ये धर्मवीर शब्द शोधलात तर जवळपास सात आठ लोकं आहेत ज्यांना धर्मवीर म्हटलं गेलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याचे रक्षक संभाजी महाराज होते. ज्यांना माझी भूमिका पटत नाही त्यांनी सोडून द्या. बाकीच्यांनी मला काहीही सांगू नये असंही अजित पवार म्हणाले.

Protected Content